इस्लामपूर : (प्रतिनिधी) भारतीय जनता युवामोर्चा महाराष्ट्र प्रदेश सहकार विभाग संयोजकपदी व सातारा जिल्हा भाजयुमोच्या प्रभारी पदी राहुल महाडिक (पेठ-जिल्हा सांगली) यांची निवड करण्यात आली. मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवामोर्चा राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत त्यांच्यावर पक्षाने आणखी नव्याने जबाबदारी टाकली आहे.
काही महिन्यापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाडीक यांची भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली होती. या निवडीनंतर महाडीक यांनी युवकांचे संघटन करण्यावर अधिक भर दिला. याची दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सहकार विभाग संयोजक पदी व सातारा जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा प्रभारी पदी निवड केली.
राहुल महाडिक हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. तर वाळवा पंचायत समितीचे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. सर्वात कमी वयाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून सांगली जिल्ह्यात यापूर्वी नावलौकिक मिळवला होता. तरुणांचे संघटन कौशल्य उत्कृष्ट असल्याने त्यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी जबाबदारी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा मतदार संघात राहुल महाडिक यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत.