पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या आणि अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील लढतीमध्ये राहुल कलाटे यांना यश आले नाही. सर्वपक्षीयांची मोट बांधण्यात यश मिळविलेल्या कलाटे यांनी कडवी झुंज दिल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले.
चिंचवडचा निकाल एकतर्फी लागणार अशी चर्चा मोडीत काढत कलाटे यांनी 1 लाख 12 हजार मते घेत जगताप यांना विजयासाठी 15 व्या फेरीपर्यंत झुंजत ठेवले. अवघ्या 38 हजारांच्या मताधिक्यावर जगताप यांना समाधान मानावे लागले. कलाटे यांच्या पराभवानंतरही शहरात याच लढतीची चर्चा रंगली होती.
चिंचवड हा सर्वांत मोठा मतदारसंघ त्यातच या मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांनी एकहाती विजय मिळविला होता. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेना भाजपाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना तब्बल 97 हजारांचे मताधिक्य मिळाल्यामुळे येथे लक्ष्मण जगताप यांना लढत देईल असा उमेदवारच नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. जगताप यांच्या समर्थकांनी दोन लाख मतांच्या फरकाने लक्ष्मण जगताप विजयी होतील, असा दावा केला होता.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा बाद झालेला उमेदवारी अर्ज, तगडी लढत देईल असा उमेदवार मैदानात नसल्याने तसेच शिवसेना भाजपाची युती असल्याने कलाटे मैदानात उतरणार की नाही? असे वातावरण निर्माण झाले होते.