पुणे – कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. भाजपने कसब्यातून टिळक कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर कॉंग्रेसने देखील रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले. तर, दुरीकडे भाजपाने पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे.
अश्यातच आता राष्ट्रवादीने देखील या जागेवर आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने ‘नाना काटे’ यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा बिनविरोध होईल अशी स्थिती असताना राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी नाना काटे यांना उमेदवारी देऊन ही निवडणुक बिनविरोध केली नाही. ही उमेदवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी जाहीर केली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
दरम्यान, आता राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी दिल्यानंतर काही लोक नाराज झाल्याचं चित्र दिसून येत आहे. या निवडणुकीसाठी राहुल कलाटे यांचंही नाव चर्चेत होतं. पण ऐनवेळी नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राहुल कलाटे नाराज झालेत. त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे.
ते काहीच वेळात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राहुल कलाटे यांच्या घरासमोर त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर जमले असून, थोड्याच वेळात ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होणार आहेत. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नाना काटे हे अजित पवारांच्या उपस्थितीत आपला अर्ज भरणार आहेत.