चिंचवडमधील महिला भगिनींनी व्यक्त केला निर्धार
पिंपरी – महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण मिळाले तरी निर्णय प्रक्रियेत म्हणावे तसे स्थान नाही. महिलांची सुरक्षितता, स्वयंरोजगारापासूनचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या आम्ही पाठिशी उभे राहू. त्यांना विजयी करुनच भाऊबीज साजरी करु, असा निर्धार मतदार संघातील महिलांनी करीत कलाटे यांच्या विजयाचा संकल्प सोडला आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना सर्वपक्षीय पाठिंबा मिळत असताना महिला वर्गही स्वयंस्फूर्तीने त्यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे पहायला मिळत आहे. शहरातील तिन्ही मतदार संघात प्रमुख पक्षांकडून एकही महिला उमेदवार रिंगणात नाही. मात्र, चिंचवड विधानसभा मतदार संघात किमान आमचे गाऱ्हाणे ऐकून घेणारा, महिलांच्या प्रश्नांची जाण असणारा उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे त्यांच्या प्रचार फेरीतील महिलांनी सांगितले. कलाटे यांची निवडणूक महिला वर्गाने हाती घेतली आहे.
त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघात यंदा दिवाळी साजरी होणार असून आम्ही विजयाच्या स्वरुपात राहुल कलाटे यांना भाऊबीज भेट देणार असल्याचे महिलांनी सांगितले. निवडणुकीपुरतीच महिलांची आठवण राजकीय नेत्यांना होते. निवडून आल्यानंतर महिलांच्या प्रश्नांचा विसर पडतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के महिलाराज आहे. परंतु, त्यांचा कारभार पुरुषच हाकत असल्याचे चित्र आहे.
वरिष्ठ पातळीवरील पुरुष नेते नगरसेविकांना काम करु देत नाहीत. आमदार म्हणून निवडून दिले असताना महापालिकेच्या कारभारात डोके घालतात. महापालिका स्तरावरीलच महिलांचे प्रश्न सोडवायला कोणाला वेळ नसताना विधानसभेत आमच्यासाठी कोण आवाज उठविणार, असा सवाल करीत राहुल कलाटे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे या महिलांनी सांगितले.
मतदार संघातील महिला विकासाचे धोरण ठरविण्यासाठी राहुल कलाटे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराची धुरा आम्ही खांद्यावर घेतली आहे. विक्रमी मताधिक्क्याने राहुल कलाटे यांना निवडून देवू, असा निर्धार या महिलांनी केला.