नवी दिल्ली -कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी बोलावलेल्या पक्षाच्या खासदारांच्या व्हर्च्युअल बैठकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित झाला. राहुल यांनी पुन्हा पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारावीत, अशी आग्रही मागणी अनेक खासदारांनी केली.
देशातील करोना संकट आणि राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी कॉंग्रेसच्या लोकसभा सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत राहुलही उपस्थित होते. कॉंग्रेसचे लोकसभेतील मुख्य प्रतोद के. सुरेश यांनी राहुल यांनी पुन्हा अध्यक्ष बनावे, अशी मागणी केली.
जनतेशी निगडीत मुद्दे लावून धरण्यात राहुल आघाडीवर आहेत. सध्याच्या कठीण काळात त्यांनी पक्षाची धुरा स्वीकारायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली. सुरेश यांच्या मागणीला अनेक खासदारांनी पाठिंबा दर्शवला. मात्र, सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीत स्वत: राहुल आणि सोनियांनी खासदारांच्या मागणीवर काही बोलण्याचे टाळले.
मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ऑगस्टमध्ये सोनियांवर हंगामी अध्यक्षा म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. तसे असले तरी कॉंग्रेसमधूनच अध्यक्षपदाचा मुद्दा वारंवार पुढे येत असतो.