राजस्थान – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात एका विवाहितेचा तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार करून त्याचे छायाचित्रण करण्यात आल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, आज राहुल गांधी यांनी बलात्कार पीडितेची भेट घेतली असून यावेळी त्यांच्यासह राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अविनाश पांडे हे देखील उपस्थित होते. याबाबत बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सांगितले की, “मी सदर बलात्कार पीडितेची भेट घेतली असून आम्ही या दाम्पत्याला न्याय मिळवून देण्यास कटिबद्ध आहोत.”
Rahul Gandhi meets Alwar gang-rape survivor, assures justice
Read @ANI story | https://t.co/qa51rhZU2B pic.twitter.com/w68wc1GFcP
— ANI Digital (@ani_digital) May 16, 2019
काय आहे अलवर बलात्कार प्रकरण?
२६ एप्रिल रोजी थानागाझी-अलवर बायपास रस्त्यावर तब्बल ६ लोकांच्या अज्ञात टोळक्याने पीडित महिला आणि तिच्या पतीला अडवले. यानंतर त्यांनी या दाम्पत्याला निर्जनस्थळी न्हेउन संबंधीत दलित महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार केला. तब्बल आठवड्यानंतर याप्रकरणी २ मे रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतरही मुजोर आरोपींनी या घटनेची व्हिडिओ क्लीप ४ मे रोजी सोशल मीडियावर व्हायरल केली. दरम्यान, अत्याचार करणाऱ्या ५ जणांसह व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.