नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला राहुल गांधींचा पाठिंबा; काँग्रेसचं राज्यात ‘एकला चलो रे’

नवी दिल्ली – काँग्रेसची प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती आल्यापासून काँग्रेस नेते नाना पटोले चांगलेच आक्रमक  झाले आहेत. आगामी काळातील सर्वच निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावरच लढेल, असे नाना पटोले यांनी ठणकावून सांगितल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

नाना पटोले काल दिल्लीत होते. त्यावेळी त्यांची राहुल गांधी यांच्याशी भेट झाली. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये एकत्र आहे. मात्र महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील पक्षाच्या भवितव्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ प्रस्तावित केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी दिली.

यावेळी नाना पटोले यांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, या निवडणुकीला तीन वर्षांचा कालावधी आहे. या संदर्भात पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील.

नाना पटोले यांनी पेगासेस प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले, 2017-18 मध्ये महाराष्ट्रात फोन टॅपिंग झालं. यातून आलेली माहिती सरकारलाच मिळते. मध्य प्रदेश आणि कर्नाटक निवडणुकीत याचा वापर केला गेला. फोन टॅपिंग हे संविधानाच्या विरोधात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.