मुंबई – भाजप विरोधातील महाविकास आघाडी राज्यभर आपल्या प्रचारसभांचा धडाका सुरु करणार आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महाविकास आघाडी संयुक्तपणे राज्यभर प्रचार करणार आहे. या संयुक्त सभांना छत्रपती संभाजीनगरमधून सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात येथील सभा पार पडणार आहे. याचा टिज़र देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘वज्रमूठ’ महाविकास आघाडीची असे बॅनर देखील सध्या व्हायरल होताहेत. मात्र या बॅनरवरून राहुल गांधींचा फोटो गायब असल्याच्या चर्च्यांना उधाण आले आहे.
महाविकास आघाडीच्या बॅनरवरून राहुल गांधींचा फोटो गायब झाल्याचे दिसून येते. या बॅनरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,काँग्रेसच्या सोनिया गांधी तसेच अजित पवार आणि नाना पटोले यांचे फोटो दिसत आहेत.यासह उद्धव ठाकरेंचा फोटो देखील मध्यभागी असल्याचे पाहायला मिळते. मात्र राहुल गांधींचा फोटो दिसून येत नाही.
या सभेचा पहिला टीजर रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे,अजित पवार आणि नाना पटोले यांच्या सभेतील काही डायलॉग पाहायला मिळत आहेत. यासह शेवटी बाळासाहेब ठाकरेंचा देखील फोटो असल्याचे दिसून येते.
आता जिंकेपर्यंत लढायचं..
चलो छत्रपती संभाजीनगर..पहिली झलक!
२ एप्रिल २०२३. सायं ५ वा. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ.
लढेंगे भी! जितेंगे भी!!#UddhavBalasahebThackeray #shivsena #ChhatrapatiSambhajinagar pic.twitter.com/3uiUWzO6NS
— Ambadas Danve (@iambadasdanve) March 27, 2023
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून वक्तव्य करत आहेत. यामुळेच महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने राहुल गांधींना सावरकरांबाबतचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा दिला होता. आता माविआच्या बॅनरवरून राहुल गांधी गायब झाल्याने ठाकरे गटाची नाराजी समोर आली आहे. 2 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरातील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा पार पडणार आहे.