नवी दिल्ली – देशावरील कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारपासून देशभरामध्ये २१ दिवसांचा लॉक डाऊन लागू केला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संसर्गातून होत असल्याने या विषाणूच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी लोकांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी लॉक डाऊन अत्यावश्यक आहे. मात्र रातोरात घोषित केलेल्या लॉक डाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांची मोठी गैरसोय झाल्याचे पाहायला मिळतंय.
अशातच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत लॉक डाऊनमुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढेल अशी चिंता व्यक्त केली आहे. या पत्रामध्ये त्यांनी, कोरोना संकटाला परतवायचे असल्यास आपल्याला भारतातील परिस्थिती अन्य देशांतील परिस्थितीपेक्षा निराळी असल्याने इतरांपेक्षा वेगळ्या उपाययोजना राबवाव्या लागतील. असं देखील सांगितलं आहे.
राहुल गांधी यांनी पत्राद्वारे व्यक्त केलेली चिंता व सुचवलेले उपाय :
- २१ दिवसीय लॉक डाऊनचे देशाचे नागरिक, समाज व अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतील.
- भारतामध्ये रोजंदारीवर जगणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने संपूर्ण लॉक डाऊन योग्य नाही.
- लॉक डाऊनमुळे देशातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढेल.
- कोरोना वृद्धांमध्ये झपाट्याने पसरत असल्याने देशातील वृद्धांच्या विलगीकरणास प्राधान्य द्यावे.
- देशातील बहुतांश वृद्ध खेडोपाड्यात राहतात. अशात लॉक डाऊनमुळे शहरात कामधंदा करणारे तरुण गावी परतत असून यामुळं गावाकडील वृद्धांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका बळावतोय.
- सरकारतर्फे घोषित करण्यात आलेलं आर्थिक पॅकेज योग्य मात्र ते गरजूंपर्यंत लवकरात लवकर पोहचावे.
- कोरोनाचे संकट बळावल्यास रुग्णालये व कृत्रिम श्वासोश्वास यंत्रणेची मोठ्या प्रमाणात गरज भासणार; यांची उभारणी आतापासूनच वेगाने सुरु करावी.
- मजुरांनी स्थलांतर थांबवावे यासाठी शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी; घर भाड्यासाठी पैसे द्यावे.
- शेतकरी, लघु व मध्यम उद्योजग यांच्याशी सरकारी पातळीवरून संवाद साधण्यात यावा. त्यांना आत्मविश्वास देणे गरजेचे आहे.
- कोरोनाच्या या संकटाचा सामना करण्यासाठी मी व काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते सरकारसोबत आहोत.
Congress MP Rahul Gandhi writes to Prime Minister Narendra Modi offering suggestions on #COVID19. Gandhi says ‘we stand together with the government in fighting and overcoming this tremendous challenge’ pic.twitter.com/nIUz2koIzy
— ANI (@ANI) March 29, 2020