नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात वर्षागणिक सुधारणा होतेय. त्यांच्या भगिनी प्रियंका या बुद्धिमान आहेत, असे प्रशस्तीपत्र माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते करण सिंह यांनी दिले.
जम्मू-काश्मीरमधील पूर्वाश्रमीच्या राजघराण्याचे सदस्य असणाऱ्या ९३ वर्षीय सिंह यांनी पीटीआय वृत्तंसस्थेला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी नेहरू-गांधी परिवाराच्या ४ पिढ्यांशी असलेल्या चांगल्या संबंधांविषयी भाष्य केले. राहुल हे अतिशय चांगले तरूण आहेत. मला ते आवडतात. ते माझ्या नेहमी संपर्कात असायचे. मात्र, अलिकडच्या काळात तितकासा संपर्क राहिलेला नाही.
राहुल त्यांच्या कार्यातून शिकत आहेत. दरवर्षी त्यांच्यात सुधारणा होतेय, असे सिंह म्हणाले. राहुल पंतप्रधान बनतील की नाही तो अटकळींचा विषय आहे. मात्र, त्यांना चांगली क्षमता प्राप्त झाली आहे. त्यांच्याकडे स्वत:ला तयार करण्यासाठी वेळ आहे, असे मत त्यांनी मांडले. प्रियंका यांना मी लहानपणापासून ओळखतो. त्यांच्यात तेज आहे, असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. सिंह यांचा वयाच्या ३६ व्या वर्षी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख गुरू म्हणून केला.