सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधींची कानउघाडणी

प्रतिज्ञापत्रामध्ये थेट माफी न मागितल्याने गोंधळ

नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात काल सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपली चूक थेट कबूल केली नाही. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गांधी यांची कान उघाडणी केली आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करताना राहुल गांधी यांनी “चौकीदार चोर है’ असे न्यायालयाने म्हटल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले होते. यावरून गांधी यांच्याविरोधात न्यायालयाच्या बदनामीचा खटला सुरू आहे.

आपण हे वक्‍तव्य निवडणूक प्रचाराच्या ओघात केले असल्याचे स्पष्टिकरण राहुल गांधी यांनी दिले असून याबद्दल खेदही व्यक्‍त केला आहे. मात्र त्यांनी आपली चूक कबूल केली नाही. याबद्दल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. एकीकडे राहुल गांधी आपली चूक कबूल करतात तर दुसरीकडे बदनामीकारक वक्‍तव्य केल्याचे नाकारतात. एकीकडे आपला तसे म्हणायचे नव्हते, असे म्हणता. तर दुसरीकडे दिलगीरी व्यक्‍त करता. एकीकडे आपली दिशाभूल केली गेली असे म्हणता, तर दुसरीकडे बदनामीकारक वक्‍तव्य केल्याचे नाकारत आहात. त्यामुळे राहुल गांधी यांना प्रतिज्ञापत्रामधून नेमके काय म्हणायचे आहे, हे समजत नाही. याकडे न्यायालयाने लक्ष वेधले आणि राहुल गांधी यांना आपल्या वक्‍तव्याबाबत स्पष्टिकरण देण्यासाठी आणखी एकदा प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना केली.

“चौकीदार चोर है’ असे न्यायालयाच्या आदेशामध्ये कोठेही म्हटलेले नाही. मग ही वाक्‍यरचना न्यायालयाची असल्याचे राहुल गांधी यांनी कसे सांगितले ? असा स्पष्ट सवाल न्यायालयाने विचारला. “दिलगीरी’ असे कंसात म्हणण्याचे काय प्रयोजन आहे, असा प्रश्‍न राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना न्यायालयाने विचारला.
“दिलगीरी’ चा शब्दकोषाप्रमाणे अर्थ माफी असा होतो, असे सिंघवी यांनी सांगितले आणि नवीन प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत मागून घेतली. त्यावर आणखी किती काळ हे प्रकरण रखडवणार, अशा शब्दात न्यायालयाने सिंघवी यांची खरडपट्टी काढली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.