राज्याच्या तिकिट वाटपात राहुल गांधी लक्ष देणार नाहीत

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी लक्ष घालणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला तिकीट दिले जावे, यासाठी कॉंग्रेसच्या बैठका नवी दिल्लीमध्ये झाल्या. पण या बैठकांना राहुल गांधी उपस्थित नव्हते. त्याचबरोबर तिकीट वाटपामध्ये त्यांनी कोणतेही मत मांडलेले नाही. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता सोनिया गांधी यांच्याकडे कॉंग्रेसचे हंगामी अध्यक्षपद आहे.

कॉंग्रेसच्या तिकीट वाटप समितीतील एका सदस्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, तिकीट वाटपामध्ये राहुल गांधी यांना लक्ष घालायचे नाही. पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करून याबद्दल निर्णय घ्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या दोन बैठका आतापर्यंत झाल्या आहेत. पण त्याला राहुल गांधी उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान, राहुल गांधी तिकीट वाटपामध्ये कोणतीही भूमिका निभावणार नसले, तरी निवडणुकीच्या प्रचारासाठी ते या दोन्ही राज्यांत जाणार आहेत. तसेच कॉंग्रेसचा प्रचार अधिक सक्षम व्हावा, यासाठी राहुल गांधी स्वतः प्रयत्न करीत आहेत, असे कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य के.एच.मुनिअप्पा यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.