नवी दिल्ली – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी केली. राहुल यांची 3 दिवसांत मिळून सुमारे 30 तास चौकशी करण्यात आली. आता त्यांना चौकशीसाठी शुक्रवारी पुन्हा बोलावण्यात आले आहे.
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी राहुल यांना सोमवारपासून सलग तीन दिवस चौकशीसाठी बोलावण्यात आले. ती चौकशी अपूर्ण राहिल्याने ईडीने त्यांना पुन्हा समन्स बजावले.
मात्र, गुरूवारी चौकशीसाठी हजर न राहण्याची मुभा राहुल यांनी मागितली. ईडीने ती मुभा देत त्यांना शुक्रवारी हजर राहण्यास सांगितले. मध्य दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात राहुल यांची चौकशी करण्यात येत आहे. त्या चौकशीवेळी तीनही दिवस राहुल यांच्या भगिनी प्रियंका गांधी ईडी मुख्यालयात उपस्थित राहिल्या.
चौकशीवेळी राहुल यांनी दिलेल्या जबाबाचे ईडीने व्हिडीओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग केले. संबंधित प्रकरणात राहुल यांच्याकडून ईडीला सुमारे 15 ते 16 प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असल्याचे समजते.
त्या प्रकरणात ईडीने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही समन्स बजावले आहे. त्यांना 23 जूनला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.