Rahul Gandhi – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘व्हाइट टी-शर्ट’ अभियान हाती घेतले आहे. त्यांनी श्रमिकांना न्याय देण्यासाठी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जनतेला केले आहे. राहुल यांनी पांढरा (व्हाइट) टी-शर्ट परिधान करून सोशल मीडियावरून एक व्हिडीओ जारी केला. त्यामधून त्यांनी अभियानाची घोषणा करत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
मोदी सरकारने गरीब आणि मेहनत करणाऱ्या श्रमिकांकडे पाठ फिरवली आहे. सरकारचे पूर्ण लक्ष केवळ निवडक भांडवलदारांना आणखी समृद्ध बनवण्याकडे केंद्रित झाले आहे. त्यामुळे सातत्याने विषमता वाढत आहे. कठोर मेहनत करणाऱ्या श्रमिकांची स्थिती आणखीच बिकट होत चालली आहे. त्यांना विविध प्रकारच्या अन्याय, अत्याचारांना सामोरे जाणे भाग पडत आहे.
त्यामुळे आपल्या सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. आपण सर्वांनी मिळून श्रमिकांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी मजबुतीने आवाज उठवूयात. त्याच विचारातून आम्ही व्हाइट टी-शर्ट अभियानाचा प्रारंभ करत आहोत. त्यामध्ये जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन राहुल यांनी केले.
कॉंग्रेस पक्षाकडूनही संबंधित अभियानाची माहिती देण्यात आली. देशाच्या अर्थव्यवस्थेला ताकद देणाऱ्यांना सन्मान, सुरक्षा मिळावी या मागणीला मजबूत बनवूयात. आर्थिक विषमता आणि भेदभावाविरोधात आवाज उठवण्यासाठी पांढरे टी-शर्ट परिधान करून अभियानात सहभागी होऊयात, असे साकडे कॉंग्रेसने जनतेला उद्देशून घातले.
त्या पक्षाने अभियानाशी संबंधित वेबसाईटही लॉंच केली आहे. पांढरा टी-शर्ट केवळ कपड्याचा प्रकार नाही. पक्षाच्या पाच तत्वांचे ते प्रतीक आहे. करूणा, एकता, सहिष्णुता, समानता आणि सर्वांची प्रगती ही ती तत्वे आहेत, असे वेबसाईटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
‘व्हाईट टी-शर्ट’ मोहीम नेमकी काय?
काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या ट्रेडमार्क लुकपैकी एक म्हणजे त्यांची पांढर्या रंगाच्या टी-शर्टमधील साधी प्रतिमा. त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांचा हा ‘लुक’ प्रसिद्ध झाला.
बुधवारी (१९ जून) २०२४ त्यांनी आपल्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त ‘व्हाईट टी-शर्ट’ मोहीम सुरू केली. नीट आणि नेट या दोन्ही परीक्षांत अनियमितता आढळल्यामुळे देशभरातील विद्यार्थी संतापले आहेत. या पार्श्वभूमीवर निषेध म्हणून त्यांनी आपल्या समर्थकांना साधे पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट परिधान करण्याचे आवाहन केले.