चर्चा कसली करताय, इथे प्रत्येकालाच जगायचं

राहुल गांधी यांचा केंद्रावर निशाणा

नवी दिल्ली – देशभरातून करोना लसीची मागणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पण केंद्र सरकारने सर्वांसाठी करोनाची लस खुली करता येणार नाही अशी ठाम भूमिका घेतली असून त्यांनी कोणत्या गटांना ही लस प्राधान्याने दिली पाहिजे यावर सातत्याने चर्चा केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर ट्‌विटरवर निशाणा साधताना म्हटले आहे की, करोना लसीच्या बाबतीत चर्चा आणि गरजांचा कसला विचार करताय, येथे प्रत्येकालाच जगायचे आहे. सरकारची ही भूमिका हास्यास्पद आहे.

पंतप्रधानांबरोबरच्या चर्चेच्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लसीचा त्वरीत जादा पुरवठा करण्याची व ही लस सर्वांनाच खुली करण्याची मागणी केली आहे. पण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आत्ताच सर्व गटांसाठी ही लस खुली करता येणार नाही असे म्हटले आहे.

विविध वयोगट, फ्रंटलाईन वर्कर्स अशा टप्प्याटप्प्याने ही लस खुली केली जात आहे. लसीचा गरजे इतका पुरवठा उपलब्ध नाही असेही कारण सरकारने त्यासाठी दिले आहे. दरम्यान आजपर्यंत देशातील आठ कोटी लोकांना ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.