वडूज – छत्रपती शिवाजी महाराजांच्या विलक्षण बुद्धिचातुर्य व अतुलनीय शौर्याचे प्रतीक असलेल्या किल्ले प्रतापगडास कॉंग्रेसचे नेते खा. राहुल गांधी नजिकच्या काळात भेट देणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव व हरणाई सहकारी सूत गिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी दिली.
भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रवासात राहुल गांधीं राज्यातील कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवर्जून भेटले. त्यांच्याकडून राहुल यांनी राज्यातील संघटनात्मक, राजकीय व सामाजिक विषय समजून घेतले. महाराष्ट्राची संस्कृती व विचारधारा या विषयांवरही राहुल गांधींनी अभ्यासकांकडून माहिती घेतली. रणजितसिंह देशमुख भारत जोडो यात्रेच्या नियोजन व अंमलबजावणी कामातील सक्रिय पदाधिकारी होते. या दरम्यान राहुल गांधींशी त्यांचा अनेकदा संपर्क झाला. भारत जोडो यात्रेच्या अंतिम टप्प्यात रणजितसिंह देशमुख यांनी राहुल गांधी यांना प्रतापगड भेटीचे लेखी निवेदन दिले.
प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी केल्याचे राहुल यांना सांगून नेहरुंनी प्रतापगडला दिलेल्या ऐतिहासिक भेटीचे उमटलेले दीर्घकालीन पडसादही त्यांच्या निदर्शनास आणून दिले. राहुल यांनी प्रतापगड भेटीचे निमंत्रण स्वीकारले असून भारत जोडो यात्रेच्या समारोपानंतर या भेटीची वेळ निश्चित केली जाणार असल्याची माहिती रणजितसिंह देशमुख यांनी दिली. प्रतापगड किल्ल्याला भेट, तेथील छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन, भवानी देवीचे दर्शन आदी कार्यक्रमांचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.