अमेठी – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी (10 एप्रिल) उत्तरप्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या आई सोनिया आणि भगिनी प्रियंका गांधी असतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल यांचा रोड शो होणार आहे. मागील 15 वर्षांपासून ते लोकसभेत अमेठीचे प्रतिनिधित्व करत आहेत. मागील वेळेप्रमाणेच यावेळीही राहुल यांच्याविरोधात भाजपने स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली आहे. मागील वेळी राहुल यांनी लाखभरापेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता. यावेळी राहुल दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवत आहेत. दुसरा मतदारसंघ म्हणून त्यांनी केरळच्या वायनाडची निवड केली. तिथून त्यांनी मागील गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.