बुधवारच्या बैठकीनंतर पुणे शहर कॉंग्रेसचा ठराव
पुणे – अखिल भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये आणि पक्षहितासाठी अध्यक्षपदावरच कार्यरत रहावे, असा ठराव पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीने बुधवारी केला. कमिटीच्या वतीने बुधवारी कॉंग्रेस भवन येथे बैठक पार पडली. त्यामध्ये हा ठराव करण्यात आला.
या बैठकीला कमल व्यवहारे, वैशाली मराठे, मनिष आनंद, सुजाता शेट्टी, अजित दरेकर, गोपाळ तिवारी, नीता रजपूत, शानी नौशाद, रमेश अय्यर, सचिन तावरे आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी हा ठराव मांडला. माजी आमदार मोहन जोशी यांनी त्याला अनुमोदन दिले. “राहुल गांधी यांनी जीएसटी, नोटबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी हे प्रश्न ऐरणीवर आणले. राफेलप्रकरण लोकांच्या मनात रूजविले. कॉंग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रभावीपणे मांडला. पक्ष कार्यकर्त्यांची गांधी कुटुंबीयांबाबतची भावना लक्षात घेता राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ नये,’ असे मत बागवे यांनी यावेळी मांडले.
तर, “राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांन देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन कॉंग्रेस पक्षाची भूमिका सविस्तरपणे मांडली. गोरगरीब जनतेची वेदना जाणून घेतली. आज कॉंग्रेस पक्ष संकटात असताना राहुल गांधी यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज पक्षाला आहे. पक्ष बळकट करण्यासाठी व पक्षाच्या भवितव्यासाठी त्यांनी राजीनामा देऊ नये,’ असे मत जोशी यांनी व्यक्त केले.