अध्यक्ष निवडीसाठी राहुल गांधींनी पॅनेल बनवावे – द्विवेदी

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष निवडीसाठी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी एक समिती स्थापन करावी अशी सुचना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांनी केली आहे. अशी समिती अधिकृतपणे नेमली गेल्यास या समितीकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना अधिकृतपणा येईल.

या समितीचे सदस्य राहुल गांधी यांनीच निवडावेत अशी सुचनाही त्यांनी केली. एकदा ही समिती स्थापन केल्यानंतर त्या समितीने पक्षातील अन्य ज्येष्ठांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून नवीन अध्यक्ष घोषित करावा अशी सुचनाही त्यांनी केली. नवीन अध्यक्ष निवडीत आपला काही सहभाग असणार नाही असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

त्या अनुषंगाने बोलताना द्विवेदी म्हणाले तांत्रिक दृष्ट्या जो पर्यंत नवीन अध्यक्ष नेमला जात नाही तो पर्यंत राहुल गांधी हेच पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनाच ही जबाबदारी स्वीकारावी लागेल असे त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची जी कृती केली आहे ती योग्य आहे. त्यांचेच अनुकरण अन्यही पदाधिकाऱ्यांनी करावे असे त्यांनी सुचितच केले.

Leave A Reply

Your email address will not be published.