इंदोर – कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपला मुलगा राहुल गांधी यांना “पॉलिटिकल प्ले स्कूल’ला पाठवावे. जेणेकरून त्याला भारतीय सभ्यता आणि भाषेचा शिष्टाचार शिकता येईल, असा टोला केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी लगाविला आहे.
कॉंग्रेसचे लोकसभा सदस्य राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या टीकेबद्दल नक्वी यांनी इंदोर येथे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना चांगलाच समाचार घेतला. नक्वी म्हणाले, कॉंग्रेसचे नेते हातात कुऱ्हाडी घेऊन फिरत असतात. आणि जेव्हा-जेव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा-तेव्हा ते स्वत:च्याच पायावर कुऱ्हाडी मारून घेतात. मला कॉंग्रेसच्या नेत्यांना, विशेषत: सोनिया गांधी यांना एक सल्ला देवू इच्छितो की, त्यांनी “पप्पुजी’ला पॉलिटिकल प्ले स्कूलला पाठवावे. जेणेकरुन ते राजकारण, सन्मान, सभ्यता, भाषा आणि शिष्टाचारांची ए, बी, सी, डी शिकू शकतील, असे ते म्हणाले.
राहुल गांधींवर टीका करताना ते म्हणाले, योग्य मानसिक संतुलन असलेले कोणीही व्यक्ती पंतप्रधानांना मारहाण करण्यास सांगू शकत नाही. कारण, लोकशाही असलेल्या या देशात त्यांना जनतेने निवडून दिलेले असते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत “आप’च्या बाजुने कौल देणाऱ्या एक्झिट पोलबद्दल विचारले असता नक्वी म्हणाले की, एक्झिट पोलच्या ट्रेंडवर आपण काय भाष्य करावे? निकाल लागल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील. दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या 70 सदस्यांच्या निवडणुका शनिवारी घेण्यात आल्या असून मंगळवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत.