Rahul Gandhi – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नवा सरकारी बंगला मिळणार आहे. हाऊस कमिटीने त्यांना दिल्लीतील सुनहरी बाग रोड, बंगला क्रमांक ५ चा पर्याय सुचवला आहे. राहुल यांनी होकार कळवल्यावर संबंधित बंगला त्यांचा नवा पत्ता ठरेल.
खासदार बनल्यानंतर राहुल यांना १२, तुघलक लेन हा बंगला मिळाला. मात्र, मागील वर्षी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्याने खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर त्यांनी तो बंगला सोडला.
त्यानंतर त्यांनी मुक्काम त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्या १०,जनपथ बंगल्यात हलवला. खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतरही राहुल तिथेच राहत होते. ते यावेळच्या लोकसभा निवडणुकीत बाजी मारून पुन्हा खासदार बनले.
कॉंग्रेसने त्यांच्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवली. त्या पदामुळे राहुल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे टाईप ८ बंगल्यासाठी ते पात्र ठरले आहेत.
राहुल यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी नुकतीच सुनहरी बाग रोड बंगल्याला भेट दिली. त्यानंतर तो बंगला राहुल स्वीकारणार की नाही याविषयीचे कुतूहल आणखी वाढले आहे.