पुणे – “माफी मागायला मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे,’ या कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानावरून महापालिकेत सत्ताधारी भाजप आणि विरोध राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसमध्ये सोमवारी महापालिका मुख्य सभेतच घोषणाबाजी रंगली. शिवसेनेने मात्र, तटस्थ भूमिका घेतली. राहुल यांच्या विधानाचा निषेध करून भाजपने सभा तहकूब केली.
मुख्यसभेचे कामकाज सुरू होताच, महाविकास आघाडीच्या सदस्यांनी घोषणा देत, नव्या राज्य सरकारचे अभिनंदन केले. तेव्हा, “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो’ अशा घोषणा भाजपच्या सदस्यांनी देण्याला सुरूवात केली. त्या गोंधळातच शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिनंदनाचा ठराव मांडून सभा तहकुबी मांडली..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मुख्यसभेत मंजूर
राज्यात महाविकास आघाडीचे नव्याने सरकार स्थापन झाले आहे. तर मुख्यमंत्री पदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड झाली आहे. या बद्दल महापालिकेच्या मुख्यसभेत एकमताने अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
महापालिकेच्या सोमवारी झालेल्या मुख्यसभेत शिवसेना गटनेते पृध्वीराज सुतार यांनी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला याला विरोधी पक्षनेते दिलीप बराटे आणि कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी अनुमोदन दिले. मुख्य सभेने हा ठराव एकमताने मंजूर केला.
भगवे फेटे आणि “मी सावरकर’ टोपी
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्याने या तिन्ही पक्षाच्या सदस्यांनी डोक्यावर भगवे फेटे बांधून सभागृहात प्रवेश केला. त्यापाठोपाठ “मी सावरकर’ असा मजूकर असलेली टोपी घालून भाजपचे सदस्य आले.