नवी दिल्ली – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजप नेत्या इमरती देवी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. कमलनाथ यांनी इमरती देवी यांचा नाव न घेता ‘आयटम’ असा उल्लेख केला होता. या विधानानंतर कमलनाथ यांच्यावर अनेकांनी टीका केली होती.
कमलनाथ यांच्या अक्षेपार्ह वक्तव्यावर काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत कमलनाथ यांना खडेबोल सुनावले आहेत. ही घटना दुर्भाग्यपूर्ण असून कमलानाथ यांनी ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर केला ती मला अजिबात मान्य नाही, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी खडेबोल सुनावल्यानंतर देखील कमलनाथ माफी न मागण्याच्या निर्मयावर ठाम आहेत. कमलनाथ म्हणाले की, राहुल गांधींनी दिलेली प्रतिक्रिया हे त्यांचं मत आहे. ते वक्तव्य करताना काय संदर्भ होता याचे मी स्पष्टीकरण दिले आहे. त्यात अजून काही सांगण्याचे कारण नाही. माझा कोणाचा अपमान करण्याचा हेतूच नव्हता तर मी माफी का मागावी? जर कोणाला अपमानित झाल्यासारखं वाटत असेल तर मी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे, असं कमलनाथ म्हणाले.
काय आहे प्रकरण ?
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि डबरा विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीतील भाजपा उमेदवार इमरती देवी यांचा नाव न घेता आयटम असा उल्लेख केला होता. या विधानावरून राजकारण चांगलच तापलं आहे. विधानानंतर कमलनाथ यांच्यावर भाजपासह आता काॅंग्रेसनेतेही टीका करत असल्याचे समोर आले आहे.