पाटणा – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि पुत्र तेजस्वी यांची भेट घेतली. त्यामुळे कॉंग्रेस आणि राजद या पक्षांमधील राजकीय मैत्रीला बळ मिळण्याची चिन्हे आहेत.
राहुल यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी बिहारची राजधानी पाटण्याचा दौरा केला. ते थांबलेल्या हॉटेलमध्ये राजदच्या बैठकीसाठी तेजस्वीही दाखल झाले. दोघांच्या भेटीवेळी राहुल यांना भेटण्यास आमच्या संपूर्ण कुटूंबाला आवडेल अशी भावना तेजस्वी यांनी व्यक्त केली. त्यावेळी लालू आणि इतरांची घरी येऊन भेट घेण्याची तयारी राहुल यांनी दर्शवली. त्यानुसार, राहुल पूर्वनियोजित कार्यक्रमांनंतर लालू, राबडींची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यावेळी त्यांच्या समवेत कॉंग्रेसचे बिहारमधील काही नेतेही होते.
कॉंग्रेस आणि राजद हे राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे घटक आहेत. ते पक्ष बिहारमध्ये विरोधी बाकांवर असणाऱ्या महाआघाडीचेही प्रमुख भाग आहेत. बिहारमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. अशात दोन्ही पक्षांत काही मुद्द्यांवरून धुसफूस सुरू झाल्याचे चित्र समोर आले. काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यावरून चर्चेला तोंड फुटले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संधी मिळाल्यास आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा दर्शवली. काही मित्रपक्षांच्या नेत्यांनी त्यासाठी अनुकूलता दर्शवली. त्यामध्ये लालूंचाही समावेश होता. त्यामुळे राजद आणि इंडिया आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या कॉंग्रेसमधील संबंध ताणले गेल्याचे विश्लेषण केले जाऊ लागले. त्यासंबंधीच्या चर्चांना राहुल आणि लालू कुटूंबीयांच्या भेटीने तूर्त तरी पूर्णविराम मिळेल.