राहुल गांधी-कुमारस्वामींची भेट कर्नाटकातील काँग्रेस-जेडीयु सरकारला संजीवनी ठरणार का?

नवी दिल्ली – गेल्या काही काळापासून कर्नाटकातील काँग्रेस आमदारांनी काँग्रेस-जेडीयु आघाडी सरकारबाबत आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवल्याने कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीयु आघाडी सरकारच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असतानाच आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जेडीयुचे प्रमुख नेते तथा कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटकात एकत्र लढलेल्या काँग्रेस-जेडीयु आघाडीला मतदारांनी सपशेल नाकारले असून कर्नाटकातील लोकसभेच्या २८ जागांपैकी काँग्रेस व जेडीयुला प्रत्येकी केवळ एका जागेवर विजय संपादित करता आला आहे. कर्नाटकात भाजपने सर्वाधिक २५ जागा जिंकल्या असून एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

अशातच आता लोकसभा निवडणुकांमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी आणि कुमारस्वामी यांची आज दिल्लीत भेट घडून आली असून या भेटीबाबत राजकीय वर्तुळामध्ये काँग्रेस व जेडीयु नेतृत्व कर्नाटकातील आघाडी सरकारबाबत सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे. कर्नाटकातील काँग्रेस आमदारांतर्फे आघाडी सरकारबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देखील काँग्रेस अध्यक्षांनी आपल्या आमदारांना कानपिचक्या देताना त्यांना “आघाडी धोक्‍यात आणण्याचे वर्तन सहन केले जाणार नाही.” अशा शब्दांमध्ये तंबी दिली होती. आता राहुल गांधी व कुमारस्वामी यांची ही भेट कर्नाटकातील काँग्रेस-जेडीयु सरकारला नव संजीवनी ठरणार की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×