इंदिरा गांधींना आदरांजली वाहताना राहुल गांधी भावूक
नवी दिल्ली – इंदिरा गांधींची ज्या दिवशी हत्या झाली, केवळ त्याच्या काही तास आधी त्यांनी मला सांगितले होते की उद्या जर मला काही झाले तर तू डोळ्यातून अश्रु काढायचे नाहीत, रडायचे नाही अशी आठवण आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज इंदिराजींच्या पुण्यतिथीच्या निमीत्ताने सांगितली.
राहुल गांधी यांनी आज इंदिराजींच्या पुण्यस्मरणाच्या निमीत्ताने एक व्हिडीओं जारी केला आहे. ज्या दिवशी माझ्या आजीवर अंत्यसंस्कार झाले तो दिवस माझ्या आयुष्यातील दुसरा अत्यंत अवघड दिवस होता असेही राहुल गांधी यांनी यात नमूद केले आहे. 1984 साली याच दिवशी खलिस्तानी समर्थक सुरक्षा जवानांनी इंदिराजींवर त्यांच्या निवासस्थानीच गोळ्या घालून त्यांची हत्या केली होती.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आपली हत्या होईल याची कल्पना त्यांना आधीच आली होती. त्या दिवशी सकाळीच माझ्याशी बोलताना मला काही झाले तर रडू नकोस असे त्या म्हणाल्या होत्या, त्यावेळी मला त्यांचे बोलणे नीट लक्षात आले नाही. आणि केवळ दोन-तीन तासांनंतर त्यांची हत्या झाली.
देशासाठी काम करताना प्राण गमावणे याचा त्यांनी अभिमानच बाळगलेला आम्हाला जाणवले होते. मला दोन आई होत्या. त्यातील माझी आजी म्हणजे मला माझ्या आई सारखीच होती. माझे वडिल माझ्यावर रागवले की माजी आजी माझ्या मदतीला धावून यायची. आणि माझी दुसरी आई म्हणजे माझी खरीखुरी आई!.
जेव्हा इंदिराजींची हत्या झाली त्यावेळी मला मी माझी आई गमावल्याचे दुख: झाले असेही राहुल गांधी यांनी नमूद केले आहे. या व्हिडीओत राहुल गांधी यांनी इंदिराजींच्या अत्यंविधीचाही व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात राहुल गांधी हे दुख: व्यक्त करताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी आपला हा व्हिडीओ युट्युबवर शेअर केला आहे. तत्पुर्वी सकाळी शक्तीस्थळावर जाऊन राहुल गांधी यांनी इंदिराजींच्या स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली.