राहुल गांधी यांना जामीन

अहमदाबाद – भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा उल्लेख खून प्रकरणातील आरोपी असा केल्याने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात येथील स्थानिक कोर्टात बदनामीचा फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. त्या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी आज येथील अतिरीक्त महानगर न्यायदंडाधिकारी आर, बी इटालिया यांच्या कोर्टात हजर राहिले.

त्यांनी यावेळी आपल्यावरील आरोप अमान्य केला. कोर्टाने त्यांना दहा हजार रूपयांचा जामीन मंजुर केला. यावेळी राहुल गांधी यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने या खटल्याच्या सुनावणीवेळी अनुपस्थित राहण्याची अनुमती कोर्टाकडे मागितली. त्या अर्जावर 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीच्यावेळी निर्णय दिला जाणार आहे.सहा महिन्यांपुर्वी जबलपुर येथील एका निवडूूक प्रचार सभेत राहुल गांधी यांनी अमित शहांचा उल्लेख खून प्रकरणातील आरोपी असा केला होता.

त्या अनुषंगाने एका स्थानिक भाजप नगरसेवकाने त्यांच्या विरोधात हा खटला दाखल केला आहे. अमित शहा हे सोहराबुद्दीन खून प्रकरणात आरोपी होते पण कोर्टाने त्यांची सन 2015 मध्येच सुटका केली होती. त्यामुळे त्यांचा खुनातील आरोपी असा उल्लेख बदनामीकारक आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.

Leave A Reply

Your email address will not be published.