नवी दिल्ली : आम्ही हरियाणाच्या अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा मतदारसंघातून तक्रारी येत आहेत. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला कळवू. हक्क, सामाजिक आणि आर्थिक न्याय आणि सत्यासाठी आम्ही हा संघर्ष सुरूच ठेवू, अशी प्रतिक्रिया लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी दिली. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीच्या विजयाबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर राहुल गांधी यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आश्चर्यकारक आहेत. आम्ही हरियाणातील अनपेक्षित निकालांचे विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या तक्रारींबाबत आम्ही निवडणूक आयोगाला कळवू.
हरियाणातील सर्व लोकांच्या पाठिंब्याबद्दल आणि आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या अथक परिश्रमाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, हरियाणात काँग्रेसच्या पराभवानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या मुखपत्रातून काँग्रेसला विजयाचे रूपांतर पराभवात कसे करायचे हे माहित असल्याचे म्हणत निशाणा साधला.