नवी दिल्ली : काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’च्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ‘हेराल्ड हाऊस’मधील यंग इंडिया कंपनीच्या कार्यालयाला सील केल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी “मी नरेंद्र मोदींना घाबरत नाही, त्यांनी हवं ते करावं मी माझं काम करत राहणार,” अशी प्रतिक्रिया राहुल गांधी दिली आहे. तसेच हा सारा प्रकार म्हणजे दबाव टाकण्यासाठी केलेली कारवाई असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला आहे.
“हा सगळा धमकावण्याचा प्रयत्न आहे. त्यांना वाटतं की थोडा दबाव टाकून हे गप्प बसतील. पण आम्ही गप्प बसणार नाही,” असे राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. तसेच, “या देशात लोकशाहीविरोधात नरेंद्र मोदी, अमित शाह जे करत आहेत त्याविरोधात आम्ही उभे राहणार. त्यांनी काहीही केलं तरी आम्ही ठामपणे उभे राहणार. आम्हाला काही फरक पडत नाही,” असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
#WATCH | Delhi: Congress MP Rahul Gandhi says, “You are talking about National Herald, it’s an intimidation attempt. They think they will be able to silence us with a little pressure…We won’t be intimidated. We are not scared of Narendra Modi. They can do whatever they want…” pic.twitter.com/sC5Zgn3Vz3
— ANI (@ANI) August 4, 2022
“आम्ही घाबरणाऱ्यांमधले नाही. आम्ही नरेंद्र मोदींना घाबरत नाही. समजलं का? काही फरक पडणार नाही. देशाचं संरक्षण करणं, येथील लोकशाहीचं संरक्षण करणं देशातील ऐक्य जपणं हे माझं काम आहे आणि मी ते करत राहणार,” असे म्हणत राहुल यांनी भाजपाला थेट आव्हान दिले आहे.
‘ईडी’ने मंगळवारी ‘हेराल्ड हाऊस’वर छापे टाकले होते, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी यंग इंडियाचे कार्यालय पूर्वपरवानगीशिवाय न उघडण्याचा आदेशही काढला. ‘हेराल्ड हाऊस’वर झालेल्या कारवाईनंतर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘हेराल्ड हाऊस’सह अकबर रोडवरील काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे ‘दहा जनपथ’ निवासस्थान तसेच, शेजारी असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाभोवती पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली.
काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख व खासदार जयराम रमेश यांनी, काँग्रेस मुख्यालयाला गराडा घातला असून छावणीचे स्वरूप आल्याची टीका केली व पोलिसांच्या नाकाबंदीची चित्रफीतही समाजमाध्यमांतून प्रसारित केली होती. या प्रकरणातील चक्रे वेगाने फिरू लागल्याचे स्पष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत प्रतिक्रिया नोंदवली आहे.