नवी दिल्ली : मोदी सरकारने अब्जाधीशांना सूट देण्याचे आणि सामान्य माणसाची लूट करण्याचे धोरण अवलंबले आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. तसेच, जनतेवर वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) आणखी बोजा पडणार असल्याचा दावाही त्यांनी केला. एकीकडे कंपनी कराच्या तुलनेत प्राप्तिकर सातत्याने वाढत आहे.
दुसरीकडे सरकार जीएसटीच्या माध्यमातून अधिक वसुलीची तयारी करत आहे. जीएसटीच्या माध्यमातून सातत्याने वसुली वाढत आहे. अशात सरकार जीएसटीचा नवा टप्पा आणणार असल्याचे ऐकू येत आहे. जनतेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याची योजना असल्याचे समजते. थोडा विचार करा, सध्या विवाह समारंभांचा हंगाम सुरू आहे. त्यासाठी पै-पै जोडून रक्कम जमवली जात असणार.
अशात १ हजार ५०० रूपयांपेक्षा अधिक किमतीच्या कंपड्यांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून वाढून १८ टक्के केला जाईल. ती बाब मोठा अन्याय करणारी ठरेल. अब्जाधीशांना करांमधून सवलत देण्यासाठी, त्यांची मोठमोठी कर्जे माफ करण्यासाठी गरीब आणि मध्यमवर्गीयांची मेहनतीची कमाई करांच्या माध्यमातून लुटली जाणार आहे.
आमची लढाई याच अन्यायाविरोधात आहे. सामान्य जनतेवर टाकण्यात येणाऱ्या करांच्या बोजाविरोधात आम्ही मजबुतीने आवाज उठवू. लूट थांबवण्यासाठी सरकारवर दबाव टाकू, असा इशारा राहुल यांनी सोशल मीडियावरून दिला.