लस, ऑक्‍सिजन, औषधांबरोबरच मोदीही गायब – राहुल गांधी

नवी दिल्ली ( rahul gandhi criticizes Pm Modi ) – लस, ऑक्‍सिजन आणि औषधांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही गायब आहेत. केवळ सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, औषधांवरील जीएसटी आणि मोदींची छायाचित्रेच दिसून येत आहेत, असे टीकास्त्र कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी सोडले.

करोना संकटाच्या हाताळणीवरून कॉंग्रेस सातत्याने मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीकेची झोड उठवत आहे. आता लस, ऑक्‍सिजन आणि औषधांच्या तुटवड्यावरून राहुल यांनी ट्‌विटरवरून सरकारवर निशाणा साधला. जेव्हा देशाला संकटाला सामोरे जावे लागते; तेव्हा आपण जनतेला देतोय की जनतेकडून घेतोय आणि ते सहाय्यकारी आहे की हानीकारक असा प्रश्‍न सरकारने स्वत:ला विचारायला हवा.

मात्र, सरकार आपले कर्तव्य विसरले आहे. त्यामुळे जनतेने गरजूंसाठी एकत्र यावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. करोना संकट काळातही नवे संसद भवन आणि पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानाचा समावेश असणाऱ्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. त्यावरून मोदी सरकार चौफेर टीकेचे लक्ष्य ठरत आहे.

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोदींना नुकतेच एक पत्र पाठवले. त्यामध्ये सेंट्रल व्हिस्टाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या प्रकल्पाचा निधी करोनाविरोधी लढ्यासाठी वापरण्याचा आग्रहही विरोधकांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.