Rahul Gandhi – सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून राहुल यांच्या विरोधात मानहानीच्या खटल्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली.
झारखंडमध्ये २०१९ यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी झालेल्या सभेत राहुल यांनी शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. राहुल यांचे वक्तव्य शहा यांची बदनामी करणारे असल्याचा आरोप करत भाजपचे नेते नवीन झा यांनी मानहानीचे प्रकरण दाखल केले. त्यावरून स्थानिक न्यायालयात खटल्याची प्रक्रिया सुरू झाली.
ती रद्द करावी यासाठी राहुल यांनी दाखल केलेली याचिका झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली. त्या निर्णयाला आव्हान देत राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यांच्या बाजूने वरिष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी युक्तिवाद केला.
मानहानीची तक्रार तिऱ्हाईत व्यक्ती देऊ शकत नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने झारखंड सरकार आणि झा यांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागवले. तसेच, पुढील आदेशापर्यंत खटल्याच्या प्रक्रियेला स्थगिती दिली.