‘चौकीदार चोर है’ वरुन राहुल गांधींकडून अखेर माफीनामा

नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टानेही ‘चौकीदार चोर है’ म्हटलंय, या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर माफी मागितली आहे.

आतापर्यंत राहुल गांधी यांनी या वक्तव्याबाबत दिलगीरी व्यक्त केली होती, माफी मागितली नव्हती. पण त्यावरुन सुप्रीम कोर्टाने खंत व्यक्त करत राहुल गांधींना फटकारलंही होतं. त्यानंतर आज अखेर राहुल गांधी यांनी कोर्टाची माफी मागितली आहे, अशी माहिती राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली आहे.

राहुल गांधी यांनी याआधी 22 एप्रिल रोजी “चौकीदार चोर है’ या टिप्पणीबाबत दिलगीरी व्यक्त करत याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. राहुल गांधी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात कंसात दिलगिरी व्यक्त केली होती. तसेच निवडणूकीच्या प्रचाराच्या ओघामध्ये आपण “चौकीदार चोर है’ असे वक्‍तव्य केले होते, असे म्हटले होते.

राहुल गांधी यांनी या वक्तव्याबद्दल ज्याप्रकारे दिलगिरी व्यक्त केली होती, त्यावरुन सुप्रीम कोर्टाने खंत व्यक्त करत राहुल गांधींना फटकारताना म्हटलं होतं की “दिलगिरी व्यक्त करण्यासाठी 22 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं जातं का?” तसेच “कंसात दिलगिरी व्यक्त करण्याचा अर्थ काय आहे?” असंही विचारल.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करणाऱ्या भाजप खासदार मिनाक्षी लेखी यांच्याकडून सातत्याने माफीची मागणी केली जात होती. मात्र, आता पुढील सोमवारी (6 मे) राहुल गांधी यांच्याकडून ‘माफी’ शब्दाचा उल्लेख असलेलं प्रतिज्ञापत्र सादर केलं जाईल, त्यामुळे हे प्रकरण थांबेल अशी शक्यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.