प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड करणार अर्ज

मुंबई – माजी कर्णधार व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक (एनसीए) राहुल द्रविड यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागण्याचे संकेत जरी बीसीसीआयने दिले असले तरीही द्रविड यांना या संपूर्ण प्रक्रियेतूनच जावे लागणार आहे. बीसीसीआयने या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली असून, त्यात अर्ज दाखल करण्याचे द्रविडनेही मान्य केले आहे.

मुख्य प्रशिक्षकाची नियुक्‍ती ही आता केवळ औपचारिकता असल्याचे चित्र जरी दिसत असले तरीही बीसीसीआयने इच्छुक उमेदवारांना येत्या 26 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

मुख्य प्रशिक्षकपदासह, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक या पदांसाठीही अर्ज मागवले आहेत. तसेच एक व्यक्‍ती एक पद या नियमानुसार द्रविड अर्ज दाखल करण्यापूर्वी एनसीएचे संचालक पदही सोडणार आहे. मुख्य प्रशिक्षकपदासाठी 26 ऑक्‍टोबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज पाठवायचे आहेत, तर अन्य पदांसाठी 3 नोव्हेंबरची अंतिम तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. या पदासाठी द्रविड दावेदार असल्याचे जरी सांगितले जात असले तरीही त्याला या संपूर्ण प्रक्रियेतून जावे लागणार आहे.

2012 साली द्रविडने निवृत्ती घेतली. 2016 साली त्याला 19 वर्षांखालील भारताच्या अ संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच वर्षी भारताने 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले होते. 2019 साली द्रविड एनसीएचा संचालक म्हणून नियुक्‍त झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.