नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द वाॅल नावाने प्रसिध्द झालेल्या राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडने शालेय क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात आणखी एका व्दिशतकी खेळाची नोंद केली. समितने १४ वर्षाखालील बीटीआर शिल्ड क्रिकेट स्पर्धेत व्दिशतक साजरे केले. समितचे हे कारकिर्दीतील दुसरे व्दिशतक ठरले आहे.
समितने माल्या आदिती आंतरराष्ट्रीय शाळेकडून खेळताना तब्बल ३३ चौकारांच्या मदतीने २०४ धावांची खेळी केली. समितच्या खेळीच्या जोरावर संघाने ३ बाद ३७७ धावा उभारल्या. फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही चमक दाखविताना समितने २ बळी मिळवले व अष्टपैलू खेळाचे दर्शन घडविले. समितच्या खेळीच्या जोरावर त्याच्या संघाने श्री कुमारन संघाविरूध्दचा हा सामना २६७ धावांनी जिंकला. श्री कुमारन संघाचा डाव केवळ ११० धावांतच आटोपला.
याआधी समितने शालेय सामन्यात २५६ चेंडूत २०१ धावांची खेळीची केली होती. शालेय क्रिकेट स्पर्धेत गेल्या दोन महिन्यांत समितने ५ एकदिवसीय मर्यादित षटकांचे सामने खेळताना ६८१ धावा फटकावल्या आहेत. त्यात २ व्दिशतके, १ शतक आणि १ अर्धशतकाचा समावेश आहे. गोलंदाजीतही सरस कामगिरी करत समितने ७ बळीही मिळवले आहेत.