मुंबई – भारतीय संघाचा माजी कर्णधार व सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा बीसीसीआयमधील दैनंदिन कामकाजातील सहभाग वाढणार आहे. आयपीएल स्पर्धेशी संबंधित दोन प्रमुख समित्यांवर द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ( Rahul Dravid part of two IPL committees) द्रविड खरेतर आयपीएल स्पर्धेतील थिंक टॅन्कमधून बाहेरच होते. तसेच त्यांनी कधीही अशा कोणत्याही समितीवर काम करण्याबाबत इच्छा व्यक्त केलेली नव्हती. मात्र, आता त्यांचा आयपीएलच्या दोन समित्यांमध्ये समावेश करण्यात आला असून त्यांचा समावेश गेल्या वर्षीच या समित्यांमध्ये करण्यात आला होता. परंतु त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शहा यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता येथे झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत द्रविड यांचा आयपीएल आचारसंहिता समिती तसेच तांत्रिक समितीत समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे अधिकृत पत्र बीसीसीआयने सर्व राज्य संघटनांना पाठवले आहे.
रोखलेल्या निधीबाबत मार्ग निघणार
बीसीसीआयने 9 हजार कोटींपेक्षाही जास्त निधी न्यायिक खटल्यात रोखला होता. बीसीसीआय व राज्य क्रिकेट संघटनांचा हा अनुत्पादक व अनूचित खटल्यांमध्ये अडकला आहे. याचा उपयोग चांगल्या सुविधांसह खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केला जाऊ शकतो, असे सांगत यातून लवकरच मार्ग निघेल असे बीसीसीआयने म्हटले आहे.
मांजरेकरांना पुन्हा स्थान
वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे समालोचकांच्या पथकातून गेली तीन वर्षे बाहेर असलेल्या संजय मांजरेकर यांना पुन्हा एकदा स्थान देण्यात आले आहे. रवींद्र जडेजा तसेच अन्य काही खेळाडूंबाबत अनेकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यानंतर त्यांना या पथकातून डच्चू देण्यात आला होता. मात्र, त्यांनी दिलेल्या माफीनाम्यावर विचार करत त्यांना पुन्हा सशर्त संधी देण्यात आली आहे.