राहुल आणि प्रियंका गांधी यांचा ताफा पोलिसांनी अडवला; पायी चालत हाथरससाठी रवाना

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमध्ये हाथरस येथे एका तरुणींनी सामूहिक बलात्कार करत तिची हत्या केली आहे. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. परंतु, जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आल्याने त्यांचा ताफा यमुना महामार्गावर अडवण्यात आला. तेथून पुढील प्रवास त्यांनी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज हाथरस पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस करणार आहेत. परंतु, त्याआधीच जिल्ह्यात कलम १४४  लागू करण्यात आले होते. यामुळे पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली होती. हे आदेश ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू आहेत.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधीं यांच्या स्वागतासाठी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. यावेळी फक्त दोघांनाच पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली होती आणि कार्यकर्ते व इतर नेत्यांना रोखण्यात आले. पुढे गेल्यानंतर जेव्हा पुन्हा पोलिसांनी रोखले तेव्हा मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, पीडित तरुणी ४ सप्टेंबर रोजी हाथरसमधील शेतातून बेपत्ता झाली होती. काही कालावधीनंतर ती गंभीर जखमी अवस्थेत सापडली होती. आरोपींनी तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या हात-पायांना अर्धांगवायूही झाला होता. तिला दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. परंतु, मृत्यू झाला. अशातच पोलिसांनी दबाव आणून मध्यरात्रीच पीडितेवर अंत्यसंस्कार उरकायला लावल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केल्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.