संगमनेर – करोनाबाधितांचा निवास असलेल्या निमोणसह शहरातील रहेमतनगर परीसर आज सील करण्यात आला. या भागात प्रशासनाने कडक निर्बंध घोषित केले आहेत. संगमनेर तालुक्यात नव्याने चार रुग्ण आढल्याने येत्या 23 मे रोजी हॉटस्पॉट मुक्त होण्याचे संगमनेरकरांचे स्वप्न भंगले आहे.
करोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या संगमनेर तालुक्याला मंगळवारी धक्काच बसला. तालुक्यातील निमोण येथील दोघे, तर संगमनेर शहरातील एका महिलेसह दोघे, असे चार जण पॉझिटिव्ह आढळले. त्यातील निमोण येथील एकाचा मंगळवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. दुसऱ्याला नाशिकमध्ये दाखल करण्यात आले. शहरात सापडलेली महिला सोमवारी नाशिकमध्ये निष्पन्न झालेल्या रुग्णाची नातेवाईक असून, रहेमतनगरमधील 52 वर्षीय व्यक्तीचा पूर्वोतिहास समजू शकला नाही. या चार जणांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या थेट संपर्कात असलेल्या 32 जणांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
गेल्या रविवारी (दि.17) संगमनेर शहरातील इस्लामपुरा भागात राहणाऱ्या एका 68 वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे नाशिक प्रशासनाने नगर जिल्हा प्रशासनाला कळविले होते. मात्र ही बाब कळविण्यास नाशिकच्या प्रशासनाने तब्बल आठ दिवसांचा विलंब केल्याने नाशिकमधील सावळा गोंधळही उघड झाला होता. उशिराने मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी संगमनेरच्या स्थानिक प्रशासनाने संबंधित व्यक्तीच्या थेट संपर्कात आलेल्या दहा जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील एका 57 वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाल्याचे मंगळवारी रात्री स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या प्रकरणात गेल्या 8 मे पासून बाधित व्यक्तीसोबत असलेल्या त्यांच्या मुलाचा नाशिकमध्ये घेतलेल्या स्त्रावचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
निमोणमधील घटनेत रविवारी (दि.17) न्यूमोनिया झाल्याच्या कारणावरुन जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचा मंगळवारी रुग्णालयातच मृत्यू झाला. मात्र तोपर्यंत त्याच्या स्त्रावचा अहवाल प्राप्त नसल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांचा मृतदेह रुग्णालयातच ठेवला होता. सायंकाळी उशिराने आलेल्या अहवालात ती व्यक्ती करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तर मृत झालेल्या बाधित व्यक्तीच्या बाजूलाच राहणाऱ्या 67 वर्षीय व्यक्ती करोनाबाधित झाल्याचे नाशिक जिल्हा प्रशासनाने कळविल्यानंतर संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली.
त्या व्यक्तीचा मुलगा नाशिक पोलीस दलात असल्याने त्याने आपल्या वडिलांना उपचारांसाठी नाशिकमध्ये दाखल केले होते. तेथेच त्यांचा स्त्रावही घेण्यात आला होता. निमोणमधील मृत पावलेल्या व्यक्तीला याच व्यक्तीकडून करोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर या दोघांच्या कुटुंबांतील 20 जणांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले.धांदरफळ व कुरण रस्ता येथे बाधित व्यक्ती आढळल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या 10 मे रोजी संगमनेर शहरासह कुरण व धांदरफळ गाव हॉटस्पॉट पॉकेट म्हणून घोषित केले होते. येत्या 23 मे रोजी त्याची मुदत संपणार होती. त्यापूर्वी संगमनेरात शहर व तालुक्यात नव्याने रुग्ण वाढल्याने संगमनेरकरांच्या समस्येत निश्चितच वाढ झाली असून, प्रशासनाकडून सध्या सुरू असलेल्या हॉटस्पॉटची मुदत वाढविली जाण्याची दाट शक्यता आहे.