रेडकाचा होरपळून मृत्यू
रहिमतपूर – न्हावी बु. ता. कोरेगाव येथील धनगर वाड्यात अचानक लागलेल्या आगीत कडब्याच्या चार गंजी सहित म्हशीचे एक रेडकाचा होरपळून मृत्यू झाला असून एक रेडकू गंभीर जखमी झाले आहे. गावकरी व रहिमतपूर नगरपालिका अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास न्हावी बु. ता. कोरेगाव येथे धनगर वाड्यात अचानक गंजीनी पेट घेतल्याने एकच हाहाकार उडाला. गंजींना लागलेल्या आगीचे लोट आणि धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न करत गोठ्यातील जनावरे सोडल्याने मोठी हानी टळली.
ग्रामस्थांनी आग विझवण्यात महत्त्वाचे योगदान दिले. या आगीमध्ये भाऊ यशवंत बोरकर यांची कडब्याची गंज व त्याच बरोबर एक म्हशीचे रेडकाचा होरपळून मृत्यू झाला. असून एक रेडकू गंभीर जखमी झाले आहे. त्याचबरोबर मधुकर यशवंत बोरकर, संतोष भाऊ बोरकर, शिवाजीराव बोरकर यांची प्रत्येकी एक कडब्याची गंज जळून खाक झाली आहे. या आगीमध्ये जवळपास 2 लाखांचे नुकसान झाले आहे. आधीच चाऱ्याच्या प्रश्नांनी शेतकरी बेजार झाले असताना आगीत कडब्याच्या चार गंजी जाळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.