राहिबाई, हर्षवर्धनचा आदर्श भावी पिढीने द्यावा : पिचड

अकोले  – पद्मश्री व महाराष्ट्र केसरी हे पुरस्कार मिळवून राहीबाई पोपेरे व हर्षवर्धन सदगीर यांनी तालुक्‍याला बहुमान मिळवून दिला आहे. भावी पिढीने त्यांचा आदर्श घेऊन आपले कार्य कर्तृत्व सिद्ध करावे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवून इथली मातीला बहुमान मिळवून द्यावा, ज्या गावात व मातीत ही माणसे जन्मली त्या मातीचे दर्शन घेण्यासाठी मी आज आलो आहे, असे भावनिक उद्‌गार माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी कोंभाळणे येथे बोलताना काढले.

पद्मश्री पुरस्कार राहीबाई पोपेरे व महाराष्ट्र केसरी पुरस्कार हर्षवर्धन सदगीर यांना प्राप्त झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी पिचड बोलत होते. यावेळी माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे, उपसभापती दत्तात्रय देशमुख, नगराध्यक्ष संगीता शेटे, उपाध्यक्ष बाळासाहेब वडजे, संचालक अशोक देशमुख, रामनाथ वाकचौरे, कचरू पाटील शेटे, सुनील दातीर, राजेंद्र डावरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पिचड म्हणाले, बायफ संस्था आदिवासी उत्थानाचा कार्यक्रम राबवत आहे. महिला बचत गटातून नवनिर्मिती करून राहीबाई सारख्या कर्तृत्ववान महिला तयार झाल्या. या महिलांनी तालुक्‍याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन त्यांनी पुरस्काराचे महत्व वाढविले आहे.चंद्रकांत पाटील यांनी राहीबाईंना हक्काचे घर मिळवून देत बी बियाणाचे संवर्धन होण्यासाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे. तर हर्षवर्धन सदगीर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपले कार्य कर्तृत्व सिध्द केले.
वैभव पिचड म्हणाले, राहीमावशी यांच्याकडे सर्व प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे.

हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाहीत. ते मूळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार महिला व शेतकऱ्यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्यामार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात. त्यांचे बियाणे मडक्‍यात जतन केले जाते. हे पारंपरिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही. तालुक्‍याचे भाग्य असल्यामुळेच पद्मश्री व महाराष्ट्र केसरी हे सन्मान आपणाला मिळाले. राहीबाई म्हणाल्या मला पुरस्कार मिळाला असला तरी माझ्या मातीने माझा आज माजीमंत्री पिचड यांच्या हस्ते सन्मान केला तो लाख मोलाचा आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मला खूप मदत केली. त्यांची मी ऋणी आहे. तर किसन सदगीर यांनी पिचड व तालुक्‍याने जे प्रेम दिले ते अधिक महत्त्वाचे आहे. राहीबाई पोपेरे, पती सोमा पोपेरे, मुले तुकाराम, सखाराम, नागू , बायफचे जतिन साठे, हर्षवर्धनचे आजोबा किसन पाटील सदगीर, वडील व आई यांचा फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर कोंभाळणे ग्रामस्थ व बायफच्या वतीने पिचड पिता पुत्रांचा सत्कार केला. यावेळी अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडून धनादेश देण्यात आला. प्रास्तविक बायफचे विभागीय अधिकारी जतिन साठे यांनी केले. सूत्रसंचलन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.

कर्तृत्वान माणसे हेच फलित

40 वर्षात काय केले तर राहीबाई व हर्षवर्धन यांच्यासारखे कर्तृत्वान माणसे जन्मली हेच फलित आहे. वयाच्या 80 व्यावर्षी हा तालुक्‍याला बहुमान अधिक महत्वचा आहे. टीकाकारांना टीका करू द्या,असेही पिचड म्हणाले. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.