काऊंटी पदार्पणातच रहाणेची शतकी खेळी

हॅम्पशायर – भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेन काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. हॅम्पशायर क्‍लबकडून खेळताना नॉटिंघमशायर क्‍लबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. 2 बाद 9 धावा अशा परिस्थितीत मैदानावर आलेल्या रहाणेने कर्णधार सॅमसोबत 257 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पहिल्या डावात रहाणेला 10 धावा करता आल्या होत्या.

इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरु होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेसाठी अजिंक्‍य रहाणेची भारतीय संघात निवड झाली नाही. कसोटी संघाचा महत्वाचा सदस्य असलेल्या अजिंक्‍यला वन-डे संघात आपले स्थान पक्क करता आलेले नाही. यानंतर अजिंक्‍य रहाणेने काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. हॅम्पशायर संघाकडून काऊंटी क्रिकेट खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.

नॉटिंगहॅमशायर संघाविरुद्ध खेळताना, अजिंक्‍यने 197 चेंडूंमध्ये 119 धावा केल्या. काऊंटी क्रिकेटमध्ये पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करणारा अजिंक्‍य तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी ससेक्‍स संघाकडून खेळताना पियुष चावलाने 2009 साली, एसेक्‍स संघाकडून खेळताना मुरली विजयने 2018 साली शतक झळकावले होते. शतकी खेळी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत अजिंक्‍यचे स्वागत केले होते. तिसऱ्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीआधी अजिंक्‍य त्रिफळाचीत होऊन माघारी परतला.

इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक बॉल यांचा सामना करताना रहाणेने शतकी खेळी साकारली. त्याच्या 119 धावांच्या जोरावर हॅम्पशायरने 337 धावांची आघाडी घेतली. रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये 17 शतक झळकावली आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.