पुणे – बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी करत शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना कुचिक यांनीच नोटीस बाजवली आहे. ही नोटीस वाघ यांना बुधवारी सकाळी मिळाली. “या गुन्ह्यात न्यायालयाने मला अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. सध्या ही बाब न्यायप्रविष्ट असून चित्रा वाघ या माझी बदनामी करत आहेत. त्यांनी अब्रु नुकसानीपोटी10 कोटी भरपाई द्यावी. याबाबत आपण वाघ यांच्याविरोधात दिवाणी आणि फौजदारी दावा दाखल करणार आहोत,’ असे कुचिक यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.
वाघ यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये वाघ यांनी लिहिले आहे की, “सकाळीच कुचिकचे वकील हर्षद निंबाळकर यांची मला नोटीस आली. दुसरीकडे माझ्यावर कसा गुन्हा दाखल करता येईल यावर खलबतं सुरू आहेत. हा सगळा निव्वळ योगायोग नाही का?’
दरम्यान, वाघ व त्यांच्या साथीदारांनीच आपल्याला जीवे मारण्याची धमकी देऊन कुचिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, असा गौप्यस्फोट या प्रकरणातील पीडितेने मंगळवारी केला. इतकेच नव्हे, तर आजपर्यंत सगळे जबाब वाघ यांच्या सांगण्यावरुनच दिल्याचेही तिने नमूद केले आहे.
याविषयी अॅड. निंबाळकर म्हणाले, जामीन मिळाल्यावरही वाघ यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यांनी पुण्यातील भाजप कार्यालयामध्ये दोनदा पत्रकार परिषद घेऊन कुचिक यांच्यावर आरोप केले होते. त्याचबरोबर कुचिक व संबंधित तरुणी यांच्यातील मोबाइल चॅट पुढे आणून कुचिक यांच्यासह पुणे पोलीस व महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते. त्या सर्व पार्श्वभूमीवर ही नोटीस पाठविण्यात आली आहे.
दरम्यान, सत्यतेसाठी तयार असल्याची भूमिका वाघ यांनी मांडली असून, घेतलेल्या भूमिकेचेही समर्थन केले आहे.