चर्चेत: रॅगिंगच्या विळख्यात तरुणाई

विवेकानंद चव्हाण

महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यानुसार, रॅगिंग म्हणजे शारीरिक किंवा मानसिक इजा पोचवणारे किंवा अशा इजांसाठी कारणीभूत ठरणारे, भीती निर्माण करणारे किंवा विद्यार्थ्यासाठी लज्जास्पद ठरेल असे वर्तन होय. एखादा विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवतो ते आपल्या पाठीवर असंख्य स्वप्नांचे, अपेक्षांचे गाठोडं घेऊनच. महाविद्यालयीन जीवनात त्याला तिथे एक जाणीव होते, ती एका विशिष्ट पातळीची/स्तराची. ही पातळी किंवा हा स्तर म्हणजेच वरिष्ठ आणि कनिष्ठ अर्थात सिनिअर आणि ज्युनिअर होय. आज सिनिअर असलेला प्रत्येक विद्यार्थी हा कधीकाळी ज्युनिअर असतो. परंपरागत चालत आलेल्या तथाकथित रॅगिंगचा गाडा तो पुढे चालवत असतो…

2013 सालाच्या सुमारास एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, टेबल नंबर 21 (टेबल न. 21 हे नाव यासाठी की, भारतीय राज्यघटनेने कलम 21 नुसार “जीविताचा हक्‍क व व्यक्‍ती स्वातंत्र्याची’ हमी दिली आहे). परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट भारतीय शिक्षणप्रणालीमध्ये कीड लागलेल्या “रॅगिंग’ या सामाजिक गुन्ह्यावर भाष्य करणारा होता. महाविद्यालयीन काळात सिनियर विद्यार्थ्यांकडून झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासामुळे (रॅगिंग) चित्रपटातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला एक विद्यार्थी मनोरुग्ण होतो आणि आपल्या मुलावर झालेल्या अन्यायाचा बदला म्हणून वडिलांच्या भूमिकेत असणारे परेश रावल आपल्या मुलाचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणाऱ्या त्या सिनिअरांना “टेबल 21′ या खेळाच्या माध्यमातून धडा शिकवतात, अशी एकंदरीत या चित्रपटाची कथा होती.

चित्रपटातील कथेत जरी एका वडिलांनी आपल्या मुलावर झालेल्या अन्यायाची परतफेड आपल्यारीतीने केली खरी मात्र वास्तवात जीवन हा काही खेळ नाही, जीवनातील अशा प्रसंगांना सामोरे जाणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचे अनुभव हे अतिशय भयंकर आणि कटुतापूर्ण असतात. सध्या महाराष्ट्रातील एका वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका महिला डॉक्‍टराने रॅगिंगच्या छळाला कंटाळून केलेली आत्महत्या हे प्रकरण चर्चेत आहे. उच्चविद्याविभूषित असूनही मनाची कवाडे बंद असलेल्या काही महिला डॉक्‍टरांकडूनच एका महिलेचा छळ होत असलेली घटना ही आपल्या समाजासाठी लज्जास्पद म्हणावी लागेल. त्यामुळे रॅगिंग या विषयाचा मागोवा घेणे अगत्याचे ठरते.

महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यानुसार, रॅगिंग म्हणजे शारीरिक किंवा मानसिक इजा पोचवणारे किंवा अशा इजांसाठी कारणीभूत ठरणारे, भीती निर्माण करणारे किंवा विद्यार्थ्यासाठी लज्जास्पद ठरेल असे वर्तन होय. एखादा विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवतो ते आपल्या पाठीवर असंख्य स्वप्नांचे, अपेक्षांचे गाठोडं घेऊनच. महाविद्यालयीन जीवनात पाऊल ठेवताच त्याला तिथे एक जाणीव होते ती एका विशिष्ट पातळीची/स्तराची. ही पातळी किंवा हा स्तर म्हणजेच वरिष्ठ आणि कनिष्ठ अर्थात सिनिअर आणि ज्युनिअर होय. आज सिनिअर असलेला प्रत्येक विद्यार्थी हा कधीकाळी ज्युनिअर असतो. परंपरागत चालत आलेल्या तथाकथित रॅगिंगचा गाडा तो पुढे चालवत असतो. सिनिअर विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांची ओळख विचारण्यापासून सुरुवात झालेल्या या गोष्टीचा शेवट मात्र किती टोकाचा असू शकतो याचा अनुभव आज संपूर्ण महाराष्ट्र घेतोय.

मुळात रॅगिंग हा सामाजिक गुन्हा असण्यापेक्षा ती एक विकृती आहे असेच म्हणायला हवे. विकृती हा शब्द यासाठी की एखाद्याचे स्वतंत्र अस्तित्वच हिरावून घेण्याचा घृणास्पद प्रकार यामध्ये घडतो. रॅगिंगच्या नावाखाली शारीरिक, मानसिक त्रास देणे, जातीवाचक व वांशिक शेरेबाजी, शिवीगाळ, अश्‍लील कृत्य करण्यास भाग पाडणे इत्यादी गोष्टी सर्रासपणे केल्या जातात. काही मंडळी आमच्या सिनिअरनी आमची रॅगिंग केली असल्याने आम्हालाही आमच्या ज्युनिअरची रॅगिंग घेण्याचा जसा काही अधिकारच प्राप्त झाला आहे अशा पद्धतीने याचे समर्थन करताना पाहायला मिळतात. जर आपण त्याचे कधीकाळी बळी ठरलो आहोत तर त्याला आळा घालण्यापेक्षा जे आम्ही सोसलंय ते आम्ही दुसऱ्यावर करणार अशी मानसिकता करून अशा प्रथांना खतपाणी घालण्याचे काम ही मंडळी करताना दिसतात. अशावेळी रॅगिंग रोखण्यासाठी कायदे, प्रबोधन, त्याची अंमलबजावणी हे महत्त्वाचे असताना त्यासोबतच समाजातील अशा विकृत मानसिकतेत बदल घडवून आणणेही तितकच गरजेचे ठरते.

महाराष्ट्र शासनाने रॅगिंगविरोधी कायदा करूनही अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. रॅगिंग रोखण्यासाठी महाविद्यालयात रॅगिंगविरोधी पथक तयार करणे, रॅगिंगविरोधी विभाग/समिती नेमणे, महाविद्यालयीन तथा वसतिगृह परिसरात सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित करणे, विद्यार्थ्यांशी नियमित सुसंवाद, मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे, माहितीपत्रकात रॅगिंगविरोधी सूचना असणे असे विविध उपाय सांगण्यात येतात, मात्र कागदोपत्री असलेल्या या भरगच्च नियमांची अंमलबजावणी महाविद्यालयीन स्तरावर कितपत होते आणि तक्रार आलीच तर त्याची दखल घेतली जाते का? हा मात्र संशोधनाचा विषय आहे.

आज जेव्हा आपला समाज स्वतःला आधुनिक, पुरोगामी, नवमतवादी, वैचारिक, पुढारलेला आणि उच्चशिक्षित अशी अनेक बिरुदे स्वतः भोवती घेऊन मिरवत असताना विद्यार्थ्यांना रॅगिंगमुळे स्वतःचा जीव द्यावा लागणे ही लाजिरवाणी गोष्ट नाही का? एखाद्याचे बोलणे हे समोरच्याला इतके मनाला लागावे की, त्याला आपला स्वतःचा जीव देण्याशिवाय पर्याय नसावा इतके टोकाचे असू शकते याची कल्पनाच न केलेली बरी. काही जण प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा देण्याचे प्रयत्न करतात तर काही जण या सर्व गोष्टी जीवनाचा भागच आहेत म्हणून निमूटपणे सहन करतात. आजही या देशात असंख्य असा तरुण वर्ग आहे ज्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कोठेतरी रॅगिंगविषयीच्या कटू आठवणी घर करून आहेत. सर्वांना समान वागणूक हाच आपल्या घटनेचा पाया आहे, रॅगिंगसारख्या समाजविघातक कृत्यांमुळे समाजाचा पाया डळमळीत होताना दिसत आहे. सरतेशेवटी माणसाने माणसाला माणूस म्हणून जगू देण्याइतपत माणुसकी दाखवावी एवढीच माफक अपेक्षा!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.