फॉग्निनीकडून राफेल नदालला पराभवाचा धक्‍का

मॉंटेकार्लो -राफेल नदालचे मॉंटेकार्लो टेनिस स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. नदालचा इटलीच्या फॅबिओ फॉग्निनीने 6-4, 6-2 असा सहज पराभव करत आगेकूच केली. त्यामुळे नदालचे मॉंटेकार्लो स्पर्धेचे बाराव्या विजेतेपदाचे स्वप्न भंगले.

13 वे मानांकन असणाऱ्या फॉग्निनीची फायनलमध्ये सर्बियाच्या दुसान लाजोविचशी गठ पडनार आहे. फॉग्निनीने याआधी तीनवेळा नदालला क्‍ले कोर्टवर नमवले आहे. या पराभवामुळे क्‍ले कोर्टवर सलग 25 सेट जिंकल्यानंतर जागतिक रॅंकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील नदालला सेट गमवावा लागला आहे. या पराभवामुळे रफाएल नदालची मॉंटेकार्लो स्पर्धेतील 18 लढतींमधील विजयाचा सिलसिला संपुष्टात आला आहे. याआधी 2015च्या उपांत्य फेरीत जोकोविचने नदालला नमवले होते.

तर, दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बिगर मानांकित दुसान लाजोविचने दानी मेदव्हेदेव्हवर 7-5, 6-1 असा विजय मिळवत अंतिम फेरीतील आपले स्थान पक्‍के केले. जागतिक रॅंकिंगमध्ये लाजोविच 48व्या क्रमांकावर आहे. या लढतीच्यावेळी कोर्टवर सुसाट वारे वाहत होते. मात्र अशा परिस्थितीतही आपले चित्त विचलीत होऊ न देता लाजोविचने पहिल्या सेटमधील 1-5 अशी पिछाडी भरून काढली. त्याने पहिल्या सेटमधील ही पिछाडी भरुन काढली ती सलग दहा गेम जिंकून. दुसऱ्या सेटमध्ये मात्र लाजोविचने जबरदस्त खेळ करत 4-0 अशी आघाडी घेतली होती.

यावेळी विजयानंतर बोलताना लाजोविच म्हणाला की, 1-5 अशी पिछाडी म्हणजे दुःखद स्वप्नासारखी असते. त्यामुळे मी दडपणात आलो आणि मी लय गमावून बसलो होतो. मात्र वेळीच सावरलो. मला अद्याप हे खरेच वाटत नाही की मी 1000 गुणांच्या मास्टर्स स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे असे लाजोविच म्हणाला.

फॅबिओ फॉग्निनीचा फायनलमध्ये मुकाबला होईल तो दुसान लाजोविचशी. या दोघांनीही प्रथमच मॉंटेकार्लो मास्टर्स स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या दोघांपैकी कुणीही जिंकले तरी ते त्याचे कारकिर्दीतील पहिले 1000 गुणांचे मास्टर्स जेतेपद ठरेल.

राफेल नदालला क्‍ले कोर्टवर किमान तीनवेळा पराभूत करण्याचा पराक्रम करणाऱ्या टेनिसपटूंच्या यादीत आता फॉग्निनी चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने नदालला क्‍ले कोर्टवर तीनवेळा नमवले आहे. तर जोकोविचने सात, तर गस्तॉन गॉडियो व डॉमिनिक थीएम यांनी नदालला प्रत्येकी तीनवेळा नमवले आहे. 1977 मध्ये इटलीच्या कॉरेंडो बराझुतीने मॉंटेकार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली होती. त्यानंतर या स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारणारा फॉग्निनी हा पहिलाच इटालियन टेनिसपटू ठरला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.