मेक्सिको सीटी – स्पेनचा अव्वल मानांकित टेनिसपटू व विक्रमी 21 ग्रॅंडस्लॅम जिंकणाऱ्या राफेल नदालने यंदाच्या मोसमात येथे झालेली मेक्सिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. त्याने अंतिम फेरीत इंग्लंडच्या कॅमेरॉन नॉरीचा 6-4, 6-4 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.
नदालने या स्पर्धेचे चौथे विजेतेपद मिळवले असून यापूर्वी त्याने ही स्पर्धा 2005, 2013 व 2020 साली जिंकली होती. नदालने या विजेतेपदासह 91 वे एटीपी स्पर्धांचे विजेतेपदही आपल्या नावावर केले.
गेल्या दोन मोसमांपासून सातत्याने दुखापतींचा सामना केलेल्या नदालने यंदाच्या मोसमात सलग 15 सामने जिंकण्याचा विक्रमही साकार केला. नदालने 2022 सालातील तिसरे विजेतेपद मिळवले आहे.
त्याने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवताना विश्वविक्रमी 21 वे ग्रॅंडस्लॅमही पटकावले होते. त्याच्यासमोर आता सर्वाधिक एटीपी विजेतेपद साकार करणारे इव्हान लेंडल (94), रॉजर फेडरर (103) व जिमी कॉर्नर्स (109) यांच्या कामगिरीला मागे टाकण्याची संधी आहे.