केमिकलयुक्‍त, मैलामिश्रित पाण्याने मुळा नदीपात्र गुदमरतेय

कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

सांगवी – एकीकडे महापालिका मैलाशुद्धीकरण केंद्रांसाठी करोडो रुपये खर्च करताना दिसते; तर दुसरीकडे कंपन्यांचे फेसाळलेले प्रदूषित पाणी, तसेच ड्रेनेज लाईनचे मैलायुक्त पाणी थेट नदीपात्रात येत आहे. यामुळे पिंपळे निलख परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली असून, मुळा नदीपात्रात जलपर्णीची चादर पसरली आहे. नदीपात्रातील जलपर्णी काढून टाकावी आणि प्रदूषित पाणी मुळा नदीपात्रात सोडणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून नदीपात्रात सोडल्या जात असलेल्या प्रदूषित पाण्यामुळे अवाढव्य प्रमाणात जलपर्णी वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन नदीपात्र दूषित झाले आहे. दुर्गंधीमुळे आणि डासांच्या उपद्रवामुळे नागरिक अगोदरच त्रासून गेले आहेत. त्यात भरीस भर म्हणून मोठी ड्रेनेजलाइन फुटल्याने मैलायुक्त पाण्याचा फ्लो थेट मुळा नदीपात्रात सोडून दिला आहे. मैलाशुद्धीकरण केंद्राकडे या ड्रेनेजलाइनमधून मैलायुक्त पाणी जात नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या मैलाशुद्धीकरण केंद्राचा उपयोग काय? असा सवाल आहे. या ड्रेनेजलाइन गेल्या कित्येक महिन्यांपासून लिकेज आहेत. याबाबत मलनिस्सारण विभागाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.

एवढेच नाही तर अनेक कंपन्या दूषित केमिकलयुक्त पाणी नदीपात्रात सोडत आहेत. त्यामुळे पिंपळे निलख जवळ हे दूषित पाणी फेसाळलेल्या अवस्थेत पाहायला मिळते. पाण्याच्या दुर्गंधीचा नदीकाठच्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असून, यामध्ये महापालिका आयुक्त, महापालिकेचा संबंधित विभाग आणि चालू असलेल्या कामाचा ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

महापालिका प्रशासन नदी प्रदूषणाबाबत कमालीचे उदासीन आहे. मुळा नदीपात्रात ड्रेनेजमधून लाखो लिटर मैलायुक्त पाणी मुळा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. मैलायुक्त पाणी थेट नदीपात्रातच सोडायचे असेल, तर मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारून नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करायचा कशाला? मैलाशुद्धीकरण केंद्रे पूर्ण क्षमतेने चालली पाहिजेत. नदीपात्रात थेट मैलापाणी सोडून महापालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. तातडीने या ड्रेनेजलाइन दुरुस्त करण्यात याव्यात. तसेच जलपर्णी काढून टाकून डासांपासून नागरिकांची सुटका करण्यात यावी.
– शिरीष साठे, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळे निलख

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.