निविदा प्रक्रियेत राधिका रस्त्याच्या पॅचिंगचे काम खोळंबले

सातारा – सातारा शहरातील वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या राधिका रस्त्याच्या पॅचिंगचे काम अजून निविदा प्रक्रियेतच खोळंबले आहे. निविदा उघडण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर असल्याने अजून आठवडाभर तरी राधिका रस्ता खड्ड्यातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सातारा पालिका कागदी घोडे नाचवत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

शहराचे कारभारी बेफिकीर असल्यावर पायाभूत सुविधांचे कसे वाटोळे होते, याचा प्रत्यय सातारा शहरात पदोपदी येत आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी शहरातील खड्डे युद्धपातळीवर बुजवण्याचे आदेश दिल्यानंतरही आधी परतीच्या पावसाचे कारण, नंतर शहरातील रस्त्यांचे कमराबंद सर्वेक्षण आणि आता निविदा प्रक्रिया, असे कागदी घोडे नाचवण्यातच पालिकेने बारा दिवस वेळकाढूपणा केला.

तांत्रिक परवानगीची कायदेशीर बाजू मान्य केली तरी कार्योत्तर मंजुरीचा पर्यायसुद्धा होता. नागरिकांना देण्याच्या सुविधांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग फक्‍त नियमांवर बोट ठेवत असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. दैनिक “प्रभात’ने पालिकेच्या बांधकाम विभागाकडून शहरातील रस्त्यांच्या पॅचिंगच्या कामांच्या ई-निविदांची माहिती घेतली असता, पहिल्या टप्प्यात एक ते वीस प्रभागांमधील रस्त्यांचे पॅचिंग हातात घेण्यात येणार असून त्यामध्ये दीड किलोमीटरच्या राधिका रस्त्याच्या पॅचिंगचे अंदाजपत्रक दहा लाख रुपये दर्शवण्यात आले आहे.

निविदा 25 नोव्हेंबर रोजी उघडली गेल्यानंतर कार्यादेश काढण्यात येणार आणि ठेकेदार त्यानंतर दोन दिवसांनी काम सुरू करणार, म्हणजे राधिका रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरू व्हायला अजून किमान एक ते दोन आठवडे लागणार, हे स्पष्ट आहे.
सातारा मध्यवर्ती बसस्थानकाकडून राजवाड्याकडे जाण्यासाठी राधिका रस्ता सोयीचा आहे. मोठी व्यापारी संकुले, हॉस्पिटल्स, बॅंका, हॉटेल्स, अनेक व्यापाऱ्यांची गोदामे या रस्त्यावर असल्याने याला “कार्पोरेट स्ट्रीट’ म्हटले जाते.

2016 मध्ये तब्बल 70 लाख रुपये खर्च करून हा रस्ता चकाचक करण्यात आला होता. या रस्त्यावर राधिका संकुल, मल्हार पेठ कॉर्नर, कर्मवीर कॉलनी, सातारा तालुका पोलीस ठाणे, मार्केट यार्ड या परिसरात फक्‍त खड्डे आणि खड्डेच आहेत. त्यामुळे या रस्त्याने रोज ये-जा कराव्या लागणाऱ्या वाहनचालकांना व नागरिकांना मणक्‍यांच्या विकारांनी ग्रासले आहे.

या रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण असताना या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सर्वप्रथम हाती घेणे अपेक्षित असताना पालिकेला बोगदा ते शाहू चौक हा रस्ता अधिक वर्दळीचा असल्याचा साक्षात्कार झाला. त्यामुळे राधिका रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लांबणीवर पडले आहे. त्यामुळे सातारकरांना अजूनही आठ दिवस राधिका रस्त्याने जाताना धुळीतूनच प्रवास करावा लागणार आहे.

बांधकाम विभागात अंतर्गत मतभेद
पालिकेच्या बांधकाम विभागाचे उफराटे धोरणे आणि अंतर्गत मतभेदांचा फटका शहराच्या विकासाला बसत आहे. ई-निविदा प्रक्रिया गरजेची असली तरी रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर करणेही महत्त्वाचे आहे. याबाबत थेट आदेश असतानाही पालिकेने कागदी घोडे नाचवल्याने सातारकरांना विनाकारण त्रास सोसावा लागत आहे. रस्त्यांवरून प्रचंड धूळ उडत असल्याने अनेकांना श्‍वसनाचे विकार जडले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)