Ladki Bahin Yojana : राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेंतर्गत दिली जाणारी रक्कम 1500 वरून 2100 रुपये केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत महिलांना दरमहिना 1500 रुपयेच दिले जात आहेत. त्यामुळे 2100 रुपये कधीपासून मिळणार याबाबत सातत्याने विचारणा केली जात आहे. याबाबत आता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मार्च महिन्यापासून महिलांना 2100 रुपये दरमहिन्याला दिले जातील, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी योजनेवरून विरोधकांवर देखील निशाणा साधला.
लाडक्या बहिणी कारभारी झाल्या आहेत. विरोधक म्हणायचे तुमची योजना बंद होणार आहे. योजना बंद झाली का? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. तसेच, जानेवारीचा हप्ता लवकरच दिला जाणार असून, मार्च महिन्यातील अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, लाडकी बहिण योजनेंतर्गत या महिन्याचा हप्ता 26 जानेवारीच्या आधी दिला जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच, सरकारकडून या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जांची तपासणी केली जात आहे. अपात्र अथवा ज्या महिला योजनेचा लाभ घेऊ इच्छित नाही, त्या या योजनेतून बाहेर पडू शकतात, असेही सांगण्यात आले आहे.