उत्तर प्रदेशात लग्न समारंभात तृतीयपंथीयांचा राडा; नवरदेवाचे केले ‘या’ कारणामुळे अपहरण

पाटणा: घरात जेंव्हा शुभ प्रसंग असतो त्यावेळी तृतीयपंथीय आल्यानंतर त्यांचा आशीर्वाद चांगला समजला जातो. कधी कधी पैशावरून तृतीयपंथीय कार्यक्रमाची चांगलीच वाट लावतात.  दरम्यान, असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. मात्र हा प्रकार पैशावरून नसून नावरदेवावरून झला असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण  तृतीयपंथीयांनी एका लग्न समारंभात गोंधळ घालून चक्क  नवरदेवालाच आपल्यासोबत पळवून नेल्याची घटना  घडली आहे.

तरुणाने आपल्या एका सहकाऱ्याला धोका दिला आहे, आम्ही त्याचे लग्न होऊ देणार नाही, असे सांगत तृतीयपंथीयांनी नवरदेवाला आपल्यासोबत नेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.

हरदोईतील शहाबाद येथील इसरानचे मौलागंजमधील तरुणीशी काही महिन्यांपूर्वी लग्न ठरले होते. मात्र, दरवेळी काहीतरी कारण देत इसरान लग्न पुढे ढकलत होता. त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर दोन्ही कुटुंबियांनी लग्नाची तारीख नक्की केली.

इसरानच्या गावात लग्नाची तयारी सुरू होती. वऱ्हाही आणि पाहुणेमंडळी आले होते. त्याचवेळी कन्नोज जनपदहून दोन गाड्यांमधून 10 तृतीयपंथीय तेथे आले. त्यांनी आम्ही हे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. तृतीयपंथीय असे का करत आहेत, हे कोणालाच समजले नाही. त्यांनी विवाहस्थळी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

नवरदेव असणाऱ्या इसरानने आमच्या सहकाऱ्यांचे लैंगिक शोषण केले आहे. इसरानने त्याला धोका दिला आहे. तसेच त्यांच्याकडून 10 लाख रुपयेही उकळले आहेत. त्यामुळे आम्ही हे लग्न होऊ देणार नाही, असे सांगत तृतीयपंथीयांनी इसरानला आपल्यासोबत घेतले आणि ते निघून गेले.

अचानक घडलेल्या या घटनेने दोन्ही कुटुंबियांना धक्का बसला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तृतीयपंथीयांनी इसरानविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. इसरान तीन वर्षांपासून आपल्यासोबत राहत असून त्याने आपले लैंगिक शोषण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लग्नाच्या विषय काढल्यावर तो टाळाटाळ करत होता. तसेच या तीन वर्षात त्याने आपल्याकडून 10 लाख रुपये उकळल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आता तो लग्नाला नकार देत असून त्याचे दुसऱ्या तरुणीशी लग्न ठरले आहे. ते लग्न आम्ही होऊ देणार नाही, असेही तक्रारीत म्हटले आहे. इसरान आणि त्याच्या भावांनी आपल्याला कोंडून ठेवत आपले दागिने आणि पैसे लुटल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास त्यांनी ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तक्रार करणारा तृतीयपंथीय, दोन्ही कटुंबिय यांना पोलीस ठाण्यात बोलावत त्यांची जबानी नोदवून घेतली आहे. या प्रकरणी तपास सुरू असून पढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने गावात खळबळ उडाली असून घटनेची चर्चा होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.