हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील देवाळा गावात दोन गटात तुफान राडा झाला आहे. यामध्ये एक दुचाकी पेटवून देण्यात आली असून एक जण जखमी झाला आहे. हा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला आहे.
हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील एका हॉटेल जवळ हिंगोली शहरातील एक गट व अन्य एका गटामध्ये काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर हा वाद वाढल्याने दोन्ही गटातील तरुण दुचाकीवरून हिंगोली-लाख मार्गावरील देवाळा गावाच्या समोर येऊन थांबले.
या दोन्ही गटात पुन्हा बाचाबाची झाल्याने वाद उफाळून आला. या राड्यात एका तरुणाच्या डोक्याला दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तर वादात एक दुचाकी वाहन पेटवून देण्यात आले. रस्त्याच्या मधोमध दुचाकी जळण्यात आल्याने एकच धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.